काही दिवसांपूर्वी ‘जग फिरता फिरता’ या इबुकच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहायचा योग आला.
पुस्तकाचे लेखक आशिषजी सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. कामानिमित्त आणि पर्यटनाची हौस म्हणून त्यांनी जगभरातल्या जवळपास चाळीस देशांना भेटी दिलेल्या आहेत. या देशांत असताना त्यांना आलेल्या काही अनुभवांचं त्यांनी लेखन केलं.
या पुस्तकात जे अनुभव दिलेले आहेत ते कोणत्याही एका देशातले किंवा काळातले नसून लेखकानं गेल्या तीन ते चार वर्षांत केलेल्या प्रवासादरम्यान आलेले आहेत. साध्या सरळ भाषेतलं हे छोटेछोटे लेख आहेत. काही लेख आवर्जून उल्लेख करण्यासारखे आहेत जसं ‘सचोटी आणि प्रामाणिकपणा’ या लेखात जपानी लोकांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतानाच तिथली बँकिंग पद्धती कशी आहे आणि सहीचा रबरी शिक्का (हानको) कसा चालतो याचं वर्णन लेखक करतो. ही कथा वाचताना मला लक्षात आलं की, काही चायनीज किंवा कोरिअन लेखकसुद्धा असाच एक लाल किंवा क्वचित काळ्या रंगाचा शिक्का वापरतात.
‘जग फिरता फिरता’ हे सांगतानाच लेखक कुठेतरी वाचकांना प्रत्येक क्षण जग (live) असं सांगू इच्छित असावा. माझं हे मत प्रत्येक लेख वाचला की अजूनच ठाम होतं. रोजच्या घाई गडबडीच्या रहाटगाडग्यात आपण वर्तमानात जगणं कधीकधी विसरून जातो.
इबुक बघताना एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवलं की, पुस्तकाचं मुखपृष्ठ इतर किंडल आवृत्त्यांपेक्षा वेगळे आहे. ते का वेगळं आहे याचा थोडाफार अंदाज प्रकाशन-सोहळ्यात आला होता. हे एक कॉफीटेबल इबुक आहे म्हणजे थोडं चौरस आकाराचं… म्हणूनच तोच आकार किंडलच्या मुखपृष्ठासाठी निवडला गेला असेल. या मुखपृष्ठाची अजून एक खास बात म्हणजे त्यावरच्या विमानाच्या खिडकीतून बाहेर दिसणार्या उंचच उंच इमारती. ती विमानाची खिडकी माझ्यासारख्या प्रवासाची आवड असलेल्या माणसाला इबुककडे नक्कीच आकर्षित करते.

हे पुस्तक वाचताना मला एक कमी जाणवली… ती म्हणजे त्या ठिकाणची किंवा त्या देशांतली रंगीत चित्रं… जर काही लेखांमध्ये रंगीत चित्रं देता आली असती तर एक वाचक म्हणून मी लेखकाच्या नजरेतून तो देश किंवा ते ठिकाण बघू शकले असते. प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला छोटं कृष्णधवल छायाचित्र आहे… पण तेसुद्धा जर रंगीत असतं तर मजा आली असती.
स्क्रोल पद्धतीनं हे इबुक किंडलवर वाचता येत असल्यामुळे वाचनात खंड पडत नाही. या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अनुक्रमणिकेमध्ये दिलेल्या प्रकरणांच्या शीर्षकांवर क्लीक केल्यावर थेट ते प्रकरण वाचता येतं.
या पुस्तकाची छापील आवृत्ती मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित झाली आहे. मराठी छापील आवृत्ती रसिक आंतरभारतीने प्रकाशित केली आहे. किंडल आवृत्तीची निर्मिती सहयोगीनं केली आहे.
‘जग फिरता फिरता‘च्या वाचकांना वयाचं बंधन नाही. या पुस्तकाची मराठी, हिंदी आणि इंग्रजी किंडल आवृत्ती ॲमेझॉनवर उपलब्ध आहे.
हा पुस्तक परिचय सहयोगीच्या ‘आयाम’ या उपक्रमाचा भाग आहे. इतर इबुक्सच्या परिचयांसाठी आयामच्या फेसबुक पेजला भेट द्या.
इबुक – जग फिरता फिरता: भटकंती अनप्लग्ड
लेखक – आशिष गोरे
प्रकाशक – पल्लवी गोरे
निर्मिती – सहयोगी
मूल्य – १०५.०० रुपये