नर्मदा परिक्रमेवरील जगन्नाथ कुंटे यांचे ‘नर्मदेSS हर हर’ हे पुस्तक काही काळापूर्वी वाचले होते. तसेच या विषयावरील इतर लेख वाचले होते. ते सर्व लेख या परिक्रमेचे अध्यात्मिक महत्व सांगणारे होते. परंतु भारती ठाकूर यांचे हे पुस्तक जरी नर्मदे परिक्रमेवरील असले तरी याचा विषय थोडा वेगळा आहे.
भारती ठाकूर यांनी ही परिक्रमा नुसतीच नर्मदेच्या दर्शनासाठी नाही तर त्या परिसरातील भौगोलिक आणि जैविक विविधता अनुभवण्यासाठी केली. त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिणीसुद्धा होत्या. या प्रवासात त्यांना आलेले अनुभव, भेटलेले लोक आणि त्यांनी केलेले सहकार्य याच्या नोंदी त्यांनी आपल्या दैनंदिनीत केल्या. पुढे त्याचे पुस्तक व्हावे असे त्यांची मैत्रीण सौ. वंदना अत्रे यांना वाटले. त्यावेळी पुन्हा दैनंदिनी वाचताना त्यांना जाणवले की ती दैनंदिनी म्हणजे नुसत्या नोंदी नाहीत तर तो स्वतःशी केलेला एक संवाद आहे. वाचकांनासुद्धा तसेच जाणवते.
लेखिकेच्या मनस्थिती आणि व्यक्तिमत्वात होणारे बदल वाचकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. पुस्तक वाचताना माणुसकीचे एक वेगळेच दर्शन घडते. परिक्रमा करणाऱ्या लोकांचे काही नियम असतात. जसे सदाव्रत मागून स्वतःचे जेवण चुल मांडून स्वतः बनवायचे, परिक्रमा पूर्ण होईपर्यंत पलंगावर झोपायचे नाही, इत्यादी. हे सर्व करताना लेखिकेला आणि तिच्या मैत्रिणींना माणुसकीचे आणि आपलेपणाचे एक अनोखे दर्शन घडते. पुस्तक वाचताना एक गोष्ट वारंवार जाणवते ती म्हणजे ‘आनंदी राहण्यासाठी प्रत्येकवेळी पैश्याचीच गरज असते असे नाही. तर ती एक वृत्ती आहे.’
भारती ठाकूर यांचे अनुभव माणसाकडे जातीपातीच्या बंधनापलीकडे जाऊन एक माणूस म्हणून बघायला शिकवते. सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागले तर समोरून तुम्हाला तशीच प्रतिक्रिया मिळते.
या पुस्तकाने नर्मदा परिक्रमा आणि दैनंदिन आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. तुम्ही परिक्रमा करा किंवा नका करू पण हे पुस्तक नक्की वाचा. आनंदी राहण्यासाठी किती कमी गोष्टींची गरज असते हे मात्र नक्कीच कळेल. उगाच आपण ‘माझं माझं’ करून भ्रमाचे ओझे वागवत असतो आणि पैश्यांनी विकत घेता येणाऱ्या वस्तूंमध्ये सुख शोधत असतो.
नर्मदेSS हर!
HII
I AM SURYAVANSHAM
PLESE CONTACT ME WHATSAPP NO. 7631516804