गाण्यांची वही – सुधीर मोघे

जो दिसतो तुम्हा ।

तेवढाच मी नाही ।।

बघण्याला तुमच्या।

नसो वर्ज्यही काही ।।

कवितेची उत्तम जाण असणार्‍या आणि कवितेलाच आपला प्राण मानणार्‍या सुधीर मोघे यांची दुसरी ओळख गीतकार, संगीतकार आणि पटकथा लेखक अशी आहे.

‘राजा छत्रपती’ या चित्रपटातल्या गाण्यांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश झाल्यानंतर सुधीर मोघे यांनी रसिक प्रेक्षकांना अनेकानेक उत्तमोत्तम गाणी दिली.

इतर कोणत्याही ओळखीपेक्षा ‘कवी’ हीच ओळख त्यांना जास्त जवळची वाटत असावी. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘जेव्हा तो कविता लिहीत नव्हता तेव्हाही तो कवी होता आणि जेव्हा तो कविता लिहिणं थांबवेल तेव्हाही तो कवीच असेल.’

सुधीरजींनी कितीतरी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. सखी मंद झाल्या तारका, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, फिटे अंधाराचे जाळे, दयाघना यांसारखी अनेक गाणी त्यांनी लिहिली पण गीतकाराच्या भूमिकेत असतानासुद्धा त्यांच्यातलं कवीपण त्यांनी जपलं होतं.

सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह म्हणजे ‘गाण्यांची वही’. चित्रपटातली गाणी आधी ऐकलेली असल्यामुळे काही गाण्यांचे बोल त्याच विशिष्ट चालीवर वाचले गेले. त्यांच्या शब्दांतून त्या-त्या भावना अगदी सहजपणे व्यक्त होतात आणि या वैशिष्ट्यामुळेच त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.

साध्यासोप्या शब्दांत मनीचे भाव व्यक्त करणं हीच तर त्यांची विशेष ओळख होती असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही.

20200728_081452-01

गाण्यांची वही (किंडल आवृत्ती)

या इबुकमधल्या काही गाण्यांचा उल्लेख न करता या परिचयाला पूर्णत्व देता येईल असं मला वाटत नाही. शापित चित्रपटातल्या ‘तुज्यामाज्या संसाराला आनि काय हवं…’ या गाण्यातल्या –

दिस जातील, दिस येतील

भोग सरंल, सुख येईल

…या दोन ओळी नाउमेदीच्या क्षणी मनाला उभारी देतात.

‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातलं ‘आला आला वारा’ हे गाणं भातलावणीच्या प्रसंगी चित्रित केलं गेलंय… पण त्या भातरोपाच्या जागी नुकतंच लग्न झालेल्या मुलीची पाठवणी करतानाचं चित्र नजरेसमोर आणलंत तर या गाण्याची रंगत अजून खुलते.

या वहीत सुधीर मोघे यांची काही अप्रकाशित चित्रपटांसाठी लिहिलेली गाणीपण आहेत. त्याचबरोबर सुधीरजींनी गीत आणि संगीत दिलेल्या ‘सूत्रधार’ या चित्रपटातल्या हिंदी आणि इतर मराठी रचनासुद्धा आहेत. सुधीर मोघे यांच्या गाण्यांच्या काही ध्वनिफितीसुद्धा झाल्या.

या इबुकचं एक वेगळेपण म्हणजे याला प्रस्तावना आणि लेखकाचं मनोगत नाही.

स्क्रोलपद्धतीनं हे इबुक किंडलवर वाचता येत असल्यामुळे वाचनात खंड पडत नाही. वाचकांना वाचनानंद देणारी ही वही… एखाद्या गायकाला फक्त सुधीर मोघे यांचीच गाणी गायची असतील तर नक्कीच उपयोगी पडेल.

सुधीरजींच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक पैलू म्हणजे ते उत्तम चित्रकार होते. ही सर्व गाणी वाचताना असं वाटलं की, गाण्याबरोबर सुधीरजींनी काही चित्रंही रेखाटली असती तर या गाण्यांकडे त्यांच्या नजरेतून पाहतापण आलं असतं.

मुखपृष्ठ बघताना वहीचा आभास निर्माण होतो… जिच्यावर वहीच्या धन्याचं नाव आणि विषय आहे. त्याखाली कवितेच्या चार ओळी आहेत.

मांडणीसुद्धा ‘पोएट सुधीर’ यांच्यासारखीच साधी आणि सोपी आहे. थोडक्यात सांगायचं तर गाण्यांची वही म्हणजे शब्दांना स्वरांचं कोंदण…

हा पुस्तक परिचय सहयोगीच्या आयाम या उपक्रमाचा एक भाग आहे. इतर इबुक्सच्या परिचयांसाठी आयामच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 

इबुक – गाण्यांची वही

लेखक – कवी सुधीर मोघे

प्रकाशक – राम गणेश प्रकाशन

निर्मिती – सहयोगी

मूल्य – ८०‐०० रुपये

पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.

This entry was posted in Marathi and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment