एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा तर त्यातलं शिक्षण असायलाच हवं असं नाही… निखळ आनंदाच्या जोडीनं निघालं तर सारं काही आपसूक उलगडत जातं. – सुधीर मोघे
सुधीर मोघे यांचं ‘निरंकुशाची रोजनिशी’ हे इबुक कुतूहलानं वाचायला घेतलं. शब्दसुरांच्या विश्वात रमलेल्या या कवीची रोजनिशी कशी असेल याची उत्सुकताही होती. खरंतर ‘रोजनिशी’ या शब्दानं माझा जरा गोंधळच झाला… ही सुधीर मोघे यांची रोजनिशी नाही… तर विविध व्यक्तींच्या कर्तृत्वांकडे आणि स्वभावांकडे आकृष्ट झाल्यानंतर सुधीरजींच्या संवेदनक्षम मनानी टिपलेले त्या व्यक्तिमत्त्वांचे पैलू या इबुकमधून वाचकांसमोर उलगडत जातात.
‘निरंकुशाची रोजनिशी’ हे शीर्षक कसं सुचलं याची मजेशीर पार्श्वभूमी लेखकानं ‘मध्यांतर’ या प्रकरणात मांडली आहे. सुधीरजींचे वडील त्यांना प्रेमानी ‘निरंकुश’ या नावानी हाक मारायचे… त्यामुळेच ‘निरंकुशाची रोजनिशी’ हे नाव द्यावंसं वाटलं.
सुधीरजी तसे शब्दसुरांत रमणारे… तरी त्यांच्या दृष्टीनी या ‘निरंकुशाच्या रोजनिशी’चं भावनिक मोल जास्त आहे… कारण हे त्यांचं पहिलंच ललित गद्यलेखन. लेखन इतकं ओघवतं आहे की, वाचक त्या कथेत घडणार्या प्रसंगांचा साक्षीदार… क्वचितप्रसंगी साथीदार होतो. पहिल्या वाक्यानी घेतलेली वाचकाच्या मनाची पकड शेवटच्या वाक्यापर्यंत तसूभरही ढिली पडत नाही.
या इबुकमध्ये व्यक्तिचित्रण किंवा प्रसंगवर्णन करणारी छत्तीस प्रकरणं आहेत. या लेखनाला काळाची चौकट असली तरी मर्यादा नाही. प्रत्येक प्रकरण वेगळं, स्वतंत्र असल्यामुळं कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी वाचताना मजा येते. शेवटची दोन प्रकरणं तर ‘सोने पे सुहागा’.
‘सेल्फ पोर्ट्रेट’ या शेवटच्या प्रकरणाचा केंद्रबिंदू लेखक स्वत:च आहे. सुधीरजींची खूपच सविस्तर आणि वेगवेगळ्या अंगांनी घेतलेली मुलाखत या प्रकरणात आहे. सुधीरजींच्याच शब्दांत सांगायचं तर ‘इतकी सविस्तर मुलाखत यापूर्वी त्यांनी कधी दिली नव्हती.’
मुलाखत घेणं हीसुद्धा एक कला आहे असं सांगत या मुलाखतीचं अवघं श्रेय मुलाखतकाराला ते नकळत देतात.

निरंकुशाची रोजनिशी (किंडल आवृत्ती)
चित्रपट-गीतकार म्हणून सुधीरजींचा प्रवास कसा सुरू झाला हे ‘मुहूर्ताचं गाणं’ या लेखात सुधीरजी सांगतात. या लेखातलं ‘आपणहून आलेली चांगली संधी नाकारायची नाही.’ हे वाक्य तर मला खूप भावलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याविषयी बोलताना सुधीरजी ‘सल’ या लेखात आयुष्याचं एक इंगित सांगून जातात… ‘कोणतीही गोष्ट करताना सर्वस्व झोकून करावी… पण ती मिळाल्यानंतर मात्र तिच्यात गुंतून न पडता निरिच्छपणे पुढं चालायला लागावं.’
मुखपृष्ठावरचं फुलपाखरू मला लेखकाचंच प्रतिबिंब वाटतं. फुलपाखरू जसं मुक्तपणे फुलांच्या ताटव्यांवर बागडतं… तसाच शब्दांच्या आणि सुरांच्या दुनियेतला सुधीरजींचा मुक्त वावर राहूनराहून मनात रुंजी घालत राहतो.
स्क्रोल आणि पेज फ्लीप अशा दोन्ही स्वरूपांत हे इबुक उपलब्ध आहे… तुम्हांला हवंय तसं तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर निरंकुशाची रोजनिशी वाचू शकता. ती कुणीही वाचली तरी त्याला तिच्यातून काही-ना-काही नक्की मिळेल… गवसेल….
हा पुस्तक परिचय सहयोगीच्या ‘आयाम’ या उपक्रमाचा भाग आहे. इतर इबुक्सच्या परिचयांसाठी आयामच्या फेसबुक पेजला भेट द्या.
इबुक – निरंकुशाची रोजनिशी
लेखक – कवी सुधीर मोघे
प्रकाशक – राम गणेश प्रकाशन
निर्मिती – सहयोगी
मूल्य – १५०.०० रुपये
इबुक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.