झाली फुले कळ्यांची…

त्याचं नुसतं नाव जरी कानांवर पडलं तरी दर्दी वाचकाचे डोळे विस्फारतात… कदाचित कानसुद्धा पकडले जातात… कुणी त्याला बापमाणूस म्हणतं तर कुणी देवमाणूस… अर्थात कुणी काहीही म्हणो… नावात काय असतं असं तो म्हणून गेला.

आता तो कोण हे मी तुम्हाला काय सांगणार…!

तर त्याची आणि माझी तशी फारशी ओळख नव्हती. हां… मी त्याचं नाव ऐकलं होतं आणि नाही म्हणायला मागे एकदा धावती भेट झाली होती. तेव्हा तो समजायला जरा अवघडच वाटला होता. काहीसा गूढ, अगम्य… खरंतर काहीच समजला नव्हता. मग नंतर कधी त्याच्या वाट्याला गेलेच नाही.

पण त्याची आणि माझी भेट होणं नशिबात होतं.

डॉ. आशुतोष म्हणाले ‘मी तीन दिवसांत तुझी आणि त्याची ओळख करून देतो.’

‘येते…’ म्हणाले खरं पण मनात धाकधूक होती… तो आवडेल का… समजेल का…?

माझ्यासारखेच अजून काही जण आले होते त्याला समजून घ्यायला. त्यांना तसा तो आधीपासून माहीत होता पण तरीही.

पहिल्या दिवशी आशुतोषजींनी त्याची काही वाक्यं, वाक्प्रचार समजावून सांगितल्यावर लक्षात आलं ‘अरे अशाच अर्थाची वाक्यं आणि वाक्प्रचार आपल्या मराठीतसुद्धा आहेत… जसं की ‘जे चकाकतं ते सगळंच सोनं नसतं’ किंवा ‘सो-सो’

मग त्याचं जन्मगाव, त्याचे आईबाबा अशी ओळख झाली. दुसर्‍या दिवशी त्यानं लिहिलेल्या ३७ नाटकांशी ओळख झाली आणि मग काही नाटकांवर चर्चा झाली.

त्याच्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे भूतं… ती का असतील, त्यांचं प्रयोजन काय असेल, यावर सगळ्यांची चर्चा झाली. मला वाटलं की, ती भूतं म्हणजे एखाद्या नटाचं सुप्त मन किंवा त्याची अपराधी भावना असावी का…

काय तो लेखक…

मानवी मनाचे कंगोरे किती उलगडावेत त्यानं…

वाह…!

तिसर्‍या दिवशी आशुतोषजींनी त्याचं ‘ॲज यू लाईक ईट’ हे नाटक चर्चेला घेतलं. ऐकताना, बोलताना वेळ कसा गेला तेच कळलं नाही.

आशुतोषजींची त्याच्या नाटकांवर, त्याच्या भाषेवर असलेली पकड मंत्रमुग्ध करणारी आहेच पण त्यांची स्वतःची समजावून सांगण्याची शैलीसुद्धा उत्तम आहे.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम… मी त्याच्या प्रेमात पडले….

आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की, तो म्हणजे दुसरा-तिसरा कुणी नसून एकमेवाद्वितीय ‘द बार्ड’ शेक्सपिअर आहे.

आशुतोषजी तुमचे आभर. तुमच्या ‘मराठीतून शेक्सपिअर’ कार्यशाळेमुळे बार्डला समजून घेता आलं.

ज्यांना बार्डला भेटायचं असेल, त्याला समजून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी डॉ. आशुतोष जावडेकरांची तीन दिवसांची ही कार्यशाळा म्हणजे पर्वणी आहे…!

This entry was posted in My Musings and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment