घरबसल्या पिटेझरी दर्शन
माझ्या घराच्या आजूबाजूला खूप झाडं आणि शेती असल्यामुळे कोल्हे, साप, सरडे आणि काही पक्षी यांच्याशी लहानपणीच मैत्री झाली होती. वाचनाच्या आवडीतून ‘आपली सृष्टी – आपले धन’ या पुस्तकामुळे किरण पुरंदरे (किका) हे नाव माहीत झालेलं होतं.
पुढे किका अजून काही पुस्तकांतून भेटले… भेटत राहिले…!
‘रानगोष्टी’ या इबुकच्या माध्यमातून निसर्गात बेमालूमपणे मिसळून गेलेले किका अचानक समोर आले आणि सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लगेचच इबुक डाऊनलोड केलं. सगळ्यात आधी मुखपृष्ठानी लक्ष वेधून घेतलं. निळा आणि हिरवा या मनाला शांत, प्रसन्न करणाऱ्या रंगच्छटांमधून पाणी, जंगल आणि आकाश नजरेसमोर वाहत राहिले. प्रसन्न शांतता मन भरून राहिली. पुढे गोष्टीरूपानी येणार्या वादळाची नांदीच जणू…!
प्रस्तावना आणि लेखकाचं मनोगत वाचताना घरबसल्या पिटेझरी दर्शन घडणार यची खातरजमा झाली.
पिटेझरीचं जंगल, तिथले गोंड आदिवासी, पाटलीणबाई, छोटा साहेब, सरडे, सरपकिटरू हे सगळे किकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले. प्रत्येक ऋतूचा वेगळा साज ल्यायणारं जंगल, पशुपक्षी, जीवनशैली हे सारं रानगोष्टींमधून उलगडत गेलं.
पाऊस झाला की सुरू होणारी लगबग रोवनात दिसली तर तुरीच्या हंगामात खाण्याच्या आशेनी येणारी रानडुकरं, माकडं आणि चितळं यांच्यापासून धान्याचं संरक्षण करण्यासाठी गावकर्यांनी केलेल्या जुगाडानी लक्ष वेधून घेतलं.
पशुपक्षी निसर्गाचं संवर्धन कसं करतात याची प्रचिती वनश्री पुरस्काराच्या दावेदारानी दिली. जंगल म्हटलं की वाघसिंहाच्या गोष्टी नसतील तर कशी मजा येणार असं वाटतं ना… या पुस्तकात वाघसिंह नाहीत पण छोटे साहेब म्हणजे बिबटे आहेत हं… फोटोमधून ते वाचकांच्या भेटीला येतात. इबुकमधल्या गोष्टी जंगलाकडे आणि त्याच्या अधिवासाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देतात.
पाण्याचा घडा भरल्यानंतर आत येणार्या नवीन पाण्याला वाट करून देण्यासाठी जसा वाहायला लागतो ना तसंच काहीसं किकांचं झालं असावं का… असा प्रश्न इबुक वाचताना पडला.
प्रत्येक क्षणाला अनुभवत असलेलं जंगल, त्यातले अनुभव लिहिल्याशिवाय नवीन अनुभव आत साठवणं अशक्य होऊन विचारांचा वेग गाठताना लेखणीची दमछाक झाली असणार आणि त्या अनुभवांच्या रानगोष्टी कधी झाल्या हे किकालासुद्धा कळलं नसणार…!
रानगोष्टी वाचल्यानंतर जंगलात जायचं सोडून मी इथं काय करतेय हा प्रश्न मला पडलाय… तुम्हालासुद्धा असा प्रश्न पडला, आपण ज्या अन्नसाखळीचा घटक आहोत तिच्याबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं तर किकांच्या रानगोष्टींमधून आता त्यांना कधीही भेटा…!
हा पुस्तक परिचय सहयोगीच्या आयाम या उपक्रमाचा एक भाग आहे. अधिक महितीसाठी आयामच्या फेसबुक पेजला भेट द्या.
इबुक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.
रानगोष्टी या कार्यक्रमात किरण पुरंदरे यांनी सादर केलेली कविता…

Pingback: रानगोष्टी – किरण पुरंदरे | Sahayogi