फास्टर फेणे सोनेरी पडद्यावर !

फास्टर फेणे वर सिनेमा येणार हे वाचूनच तो बघायची इच्छा होती. माझ्या लहानपणाचा सुपरहिरो होता  तो. म्हणजे अजूनही आहे.  भा. रा. भागवत यांनी फास्टर फेणेला निर्माण केले आणि ‘ superhero’ हि कल्पना समजण्याच्या आधीच भा. रा. भागवत  यांचा हा मानस पुत्र (फा. फे.) माझ्या  लहानपणाचा सुपरहिरो बनला होता. सिनेमा बघायची तर खूप इच्छा होती पण इथे दुबईत तसे मराठी सिनेमा खूप कमी येतात. जे आले ते कुणीतरी मुद्दाम एक किंवा दोन शो साठी आणले होते. त्यामुळे फा. फे. इथे येणार कि नाही असा प्रश्न होता. पण थोड्याच दिवसात पेपरमधून कळले कि फा. फे. ची दुबई फेरी नक्की झाली आहे. मग काय लगेच तिकिटे काढली गेली. सिनेमा बघायाल गेल्यावर लक्षात आले कि बरेचसे आईवडील आपल्या मुलांना घेवून आले होते आणि फा. फे. च्या गोष्टी सांगत होते.

सिनेमा सुरु झाला आणि न कळत मन अलगद भूतकाळात गेले. डोळ्यासमोर त्या उत्कर्ष प्रकाशनाची फा. फे. ची पुस्तके आणि त्यातील चित्रे उभी राहिली. अचानक तो टाॅssक्  असा आवाज कानावर आला आणि मन वर्तमानात परत आले. सिनेमामध्ये फा. फे. च्या काळातील मेडिकल प्रवेश परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करतो. अर्थात त्याच्या खास शैलीने. पुस्तकातील गोष्टी कदाचित आजच्या पिढीच्या मनाचा ठाव घेवू शकणार नाहीत आणि म्हणूनच सध्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी लक्षात घेवून हा सिनेमा बनवला गेला आहे.

सिनेमा आणि पुस्तकाची तुलना होणे शक्य नाही पण सिनेमाचा प्रयत्न चांगला आहे. सध्याच्या पिढीला फा. फे. शी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अमेय वाघने फास्टर फेणे चांगला रंगवला आहे. फास्टर फेणे म्हटले कि डोळ्यासमोर एक बारीक, कीडकिड्या मुलगा उभा राहतो. अमेय वाघने ते चित्र जपायचा प्रयत्न केला आहे. पण सुमित राघवन याने पडद्यावर साकारलेल्या फास्टर फेणे ची मजा काही वेगळीच होती.

एकदा तरी नक्की बघावा असा फास्टर फेणे! बघू दुसरा सिनेमा येतो का नवीन काही कारनामे घेवून!

 

 

 

This entry was posted in My Musings and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment