‘नाही नको… नको… बंद करा…’ तो ओरडत झोपेतून उठला.
‘काय झालं बाळा? गेले काही दिवस तू रोज घाबरून उठतोस. काही तरी बडबडत असतोस. निदान काही समजेल असं आज बोललास. नाहीतर ‘शीला… शीला की जवानी…’, ‘गोली मार भेजे में…’, ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय…’ असलं काही तरी बरळतोस…’ काळजीच्या सुरात आई म्हणाली.
‘पृथ्वीवर गेल्यावर कुठे जातो काय माहीत… आल्यावर अंगात आल्यासारखा वागत असतो. दचकून उठतोस काय… चित्रविचित्र अंगविक्षेप काय करतोस… काही कळेनासं झालंय.’
गणेश जागा झाला… आपण कुठे आहोत याचा अंदाज त्यानं डोळे चोळत घेतला.
समोर गर्दी नव्हती… कचर्याचे ढीग नव्हते की लोकांची रांग नव्हती. तो घरी परत आलाय याची जाणीव व्हायला दोन मिनटं लागली.
‘बाळाऽ मोदक देऊ की गरमगरम खीर देऊ?’ आईनं विचारलं.
‘हं…ऽ आई खरं सांगू? आज काहीच खावंसं नाही वाटतंये.’ गणेश कळवळून म्हणाला.
‘काऽ रेऽ? बरं वाटत नाही का?’ त्याच्या कपाळाला हात लावून आई म्हणाली.
‘नाही गंऽ ठीक आहे मी पण गेले काही दिवस वेळीअवेळी खूप खाणं झालंय त्यामुळे आज जरा पोटाला आराम द्यावा म्हणतोय.’ पोटावरून हात फिरवत गणेश म्हणाला… ‘…आणि हो आज सगळ्यांना सांग की, अजिबात आवाज करू नका… मला शांतता हवीये…’ हातांनी कान झाकायचा फुका प्रयत्न करत गणेश शांतभवनाकडे जात म्हणाला.
आता मात्र आईला काळजी वाटायला लागली. तसं तर दरवर्षी अकरा दिवसांनी आल्यावर एक दिवस शांतभवनात घालवतो तो पण या वर्षी काहीतरी जास्तच बिनसलं होतं. अगदी दीड दिवसांनी परत आला तेव्हासुद्धा तो शांतभवनात बसला होता.
थोड्या वेळानं ती शांतभवनात बसलेल्या गणेशाला भेटायला गेली. कापराचा सुगंध वातावरणाला एक वेगळीच ऊर्जा देत होता.
‘गणूबाळाऽ काय झालं?’ गणेशाच्या डोक्यावरून हात फिरवत तिनं विचारलं.
‘अगंऽ काय सांगू आई? तो डीजे, झांजा, ढोलताशे… या सगळ्या आवाजांनी जीव मेटाकुटीला आलाय बघ अगदी… आणि या सगळ्यांच्या (बे)तालावर बेताल होऊन नाचण्यानंही.
मी येणार म्हणून नाचतात आणि माझं विसर्जन करतानासुद्धा… विसर्जन करताना नाचतात याचं वाईट नाही गं वाटत कारण जीवनाचा आनंद उपभोगला ना की जाण्याचासुद्धा उत्सव होतो…
…पण काहीच ताळतंत्र नाहीये गं त्याला. मंडळांची तर गोष्टच नको करायला आणि आता तर घरी माझी स्थापना करणारेसुद्धा तसेच वागतात… आईऽ अगं साधी माझी आरती करताना आपण काय म्हणतोय याचं भानसुद्धा नसतं… कुठलं ध्रुवपद कुठल्या अंतर्यासोबत येतं ते त्यांनाच कळो जाणे. बरंऽ प्रेमानं मनापासून करतात ना म्हणून मीही दुर्लक्ष करतो पण काही लोकं ना उगाचच घसा खरवडवून आरती करतात आणि तेही कमी म्हणून उगाचच ‘एस्सेल वर्ल्ड… एस्सेल वर्ल्ड…’ ‘राजस्थान की लाल मिट्टी…’ म्हणतात. गंमत म्हणून लहान मुलं म्हणतात ना तेव्हा मीही प्रेमात पडतो त्यांच्या पण मोठे म्हणतात तेव्हा वाटतं की, कुणीतरी यांना समजवा रे आरती, स्तोत्र आणि मंत्र यांच्यातला फरक…’ गणेश तळमळीनं बोलत होता.
‘नकोस इतका विचार करू गणेशाऽ समजेल त्यांना कधीतरी… नाहीतर आपण बाबांना सांगू.’
‘हं…! आणि विसर्जनाच्या दिवशी तर विचारूच नकोस… माझ्या मूर्त रूपाला विसर्जन करताना विचार करत नाहीत की मी निसर्गात एकरूप होईन का? काय, किती आणि कसं समजावू यांना…! आईऽ मला परत एकदा त्या उत्सवातला साधेपणा अनुभवायचा आहे. निसर्गाशी, अंतरात्म्याशी एकरूप व्हायचंय… जे काही माझ्यासाठी म्हणून करतात ना ते खरंच मला आवडतं का याचा विचार करून करा… देखावा म्हणून नको…!’ डोळ्यांत आलेलं पाणी पुसत गणेश म्हणाला.
‘गणूबाळ काही चुकीचं म्हणत नाहीये… कुठे थांबायचं याचं भान हरवत चाललंय…! आम्ही जरी दिसत नसलो, तिकडे दूर कैलासावर राहत असलो तरी तुम्ही मनातल्या मनात काय म्हणता हेसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचतं रेऽ पूजाअर्चा करताना कुणाला त्याचा त्रास तर होत नाहीये ना याचं भान ठेवायला परत एकदा शिकवायला हवं यांना…!’ आई विचार करत भवनातून बाहेर पडत होती. ‘बरंऽ गणूच्या बाबांपासून गणूचा त्रास लपवून ठेवायला हवा… गणूला होणारा त्रास बघून त्यांना येणारा राग आवरणंसुद्धा कठीण होत चाललंय…! परमेश्वराऽ बघतोय ना रे तू? आता सांभाळ सगळं तूच!’



Pingback: बाप्पाशी गप्पा…! भाग तिसरा | My Experience
Pingback: बाप्पाशी गप्पा…! भाग दुसरा | My Experience
Pingback: बाप्पाशी गप्पा…! | My Experience