बाप्पाशी गप्पा…! भाग तिसरा

‘चिनूऽ ए चिनू बाळाऽ उठतोस ना? आजोबा नि बाबा तयारपण झाले… तुला जायचंय ना त्यांच्याबरोबर गणपती आणायला?’

रात्री उशिरापर्यंत आरास करणार्‍या कंपनीच्या माणसांच्या मागेमागे करून दमलेल्या चिनूला आईनं उठवलं.

डोळे चोळत चिनू उठला.

‘ओ माय फ्रेंड गणेशाऽ तू रहेना साथ हमेशा…ऽ

टिकी टिकी टाक…

टिकी टिकी टिकी टाकऽऽ’ असं गुणगुणत झटपट आवरून तो तयार झाला. आज आईला त्याला काही सांगावं लागत नव्हतं.

कधी एकदा गणपती घरी आणतो असं त्याला झालं होतं.

बाप्पाशी काय गप्पा मारायच्या, त्याला काय विचारायचं याची मनातल्या मनात उजळणी चालली होती. 

बाप्पाला घेऊन सगळे घरी आले… आजीनं तिघांच्या पायावर पाणी ओतलं आणि भाकर तुकडा ओवाळून टाकला. आईनं तिघांना… नाही, नाही… चौघांना ओवाळलं आणि घरात यायला सांगितलं. 

चिनू कौतुकानं सगळं बघत होता.

चिनूच्या आजोबांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली. गणपतीसमोर आईनं २१ मोदकांचं नैवेद्याचं ताट ठेवलं. मध्येमध्ये चिनूची लुडबुड चालू होतीच. त्याच्या प्रश्नांची उत्तरं आजीआजोबा त्याला समजेल अशा भाषेत देत होते.

दुपारी जेवणं झाली आणि सगळे इकडेतिकडे पांगले.

चिनूला अत्यानंदानं झोपच येत नव्हती. तो एकटक मूर्तीकडे बघत होता.

बाप्पाची सोंड हळूच हलली. त्यानं टुणकन जागेवरून उडी मारली आणि मूर्तीकडे निरखून बघायला लागला.

‘हाय चिनूऽ…’

‘आँऽ गणू बाप्पाऽ खेळायला येतोस…?’ चिनू जवळजवळ ओरडला.

‘अरेऽ अरेऽ होऽ चिनू… मीच आहे. इकडं माझ्या जवळ येऽ हा मोदक खा आधी. मग आपण गप्पा मारू, खेळू, सगळं करू.’

चिनूनी एका घासात मोदक मटकावला.

‘गणू बाप्पाऽ तू माझा मित्र होशील? तुझ्या घरी कोणकोण असतं? आणि तुला काय आवडतं रे?’

‘चिनूऽ अरेऽ किती प्रश्न विचारतोस? जरा दमानं घे. होऽ मला आवडेल रे तुझा मित्र व्हायला. आधी मला सांग… तुला काय माहितीये माझ्याबद्दल…?’

‘अं… मला तुझ्या आईबाबांचं नाव माहितीये… तुला हत्तीचं तोंड का आहे… तुला मोदक आवडतात… तुझ्याकडं उंदीरमामाची गाडीये… इतकं सगळं आईनी आणि आजीनी सांगितलंय मला.’

‘अरेऽ तुला तर सगळं माहितीये की… अजून काय सांगू मी?’

‘तसं नाही हं गणूबाप्पा… बाबा म्हणतात की, तू दरवर्षी एकदा येतोस… मग तू परत का जातोस? इथेच का राहत नाहीस? मी घेईन तुझी काळजी. तू नकोस ना कुठे जाऊस.’

‘हंऽऽ अरेऽ मी इथेच असतो कायम तुझ्यासोबत. फक्त वर्षातून एकदा तुम्ही माझी मूर्ती घरी आणता. तू डोळे मिटलेस नाऽ की, मी दिसेन तुला. मग आपण गप्पा मारू.’

‘म्हणजे असं डेकोरेशन, खाऊ हे सगळं आईबाबांना रोजरोज करायला नको. असंच ना…? पण मला सांग तुला छान वाटत असेल ना… रोज नवा खाऊ, मस्त छान सजवलेलं घर… तुला आवडतं ना असं…?’ 

‘आवडतं रेऽ पण… खरं सांगू…? मला नाऽ माझ्या लहानपणाचे दिवस जास्त आवडायचे.’

‘ऑ… तूपण लहान होतास? कायकाय होतं तेव्हा? डेकोरेशन होतं का? आणि असेच मोदक मिळायचे तुला खायला?’

‘हाऽ हाऽ हाऽ कधीतरी एका वेळी एकच प्रश्न विचारशील का चिनू? माझ्या लहानपणी खूप मजा होती… तेव्हासुद्धा मला सगळे घरी घेऊन जायचे पण असं बाजारातून विकत आणून नाही बरं का… तुझ्यासारखी लहान मुलं नाहीतर त्यांचे बाबा-आजोबा माती आणून एका पाटावर मला घडवायचे… मग रंग भरायचे आणि पूजा करायचे.’ बाप्पा भूतकाळात हरवून गेला.

‘कुणी दीड, कुणी तीन, कुणी पाच आणि कुणी सात दिवस ठेवायचे मला. आत्तासारखे अकरा दिवस ठेवणारे खूप कमी लोक होते.’

‘वॉव्व…! पुढल्या वर्षी मीसुद्धा तुझी मूर्ती तयार करणार…. आणि डेकोरेशन…’

‘डेकोरेशन नाही रेऽ आरास म्हणतात त्याला. तेव्हा तीसुद्धा घरच्या आणि परिसरातल्या गोष्टींनीच करायचे म्हणजे साड्या, पानंफुलं, चित्रकाम… अशाच सगळ्या गोष्टी असायच्या… मखरसुद्धा प्रेमानं सजवायचे. त्या पानाफुलांचा मंद सुगंध दरवळत राहायचा.’ दीर्घ श्वास घेऊन बाप्पा पुढे बोलायला लागला ‘आजच्यासारखं सिमेंट नि पीओपी की काय म्हणतात नाऽ त्याची मूर्ती नसायची… वेगवेगळ्या चवीचे मोदक नव्हते नि निसर्गाला घातक गोष्टींची आरास नव्हती.

हल्ली सगळंच बदलंलय… आरासचं डेकोरेशन झालं… हातानं घडवलेल्या लहानशा शाडूच्या मूर्तीची जागा मोठ्यामोठ्या मूर्त्यांनी घेतली. गूळखोबर्‍याचे मोदक जाऊन चॉकलेट, आंबा, मावा मोदक आले… पण…’ डोळे मिचकावत बाप्पा म्हणाला ‘…पण मला तेही आवडतात बरं का…!’

डोळे मिटून आठवणींच्या धुक्यात हरवलेला बाप्पा बोलत होता. चिनूच्या मागे आजीआजोबा, आईबाबा कधी येऊन उभे राहिले हे त्या दोघांना कळलंच नाही.

‘हो रेऽ चिनू, बाप्पा बरोबर म्हणतोय. मी तुझ्याएवढा होतो नाऽ तेव्हा एक महिना आधी आम्ही भावंडं गावातल्या धुरीमास्तरांच्या कारखान्यात पाट देऊन मूर्ती कशी हवी ते सांगून यायचो… मग चर्चा व्हायची ती आरास काय करायची, देखावा करायला काय लागेल याची… मखरात बसलेला बाप्पा कसा दिसेल याची स्वप्नं रंगवायचो. गणपती यायच्या आदल्या रात्री तर आम्ही सगळे जागून सजावट करायचो.

दुसर्‍या दिवशी सकाळी गणपती बसले की संध्याकाळी आम्ही सगळे मित्र प्रत्येकाच्या घरी आरतीला जायचो. काय भारी दिवस होते ते… हं… त्या वेळी सार्वजनिक गणपतीसुद्धा कोपर्‍याकोपर्‍यावर नव्हते… एका वाडीचा नाहीतर छोट्या गावाचा एकच गणपती असायचा.’ आजोबा स्मरणरंजनात रमले.

‘चिनूऽ तुझ्या प्रश्नांनी हळवं केलं सगळ्यांना…’ बाबा म्हणाले.

‘पण आता मला भूक लागलीये. जेवून खूप वेळ झालाय…’ पोटावरून हात फिरवत लंबोदर म्हणाला. 

‘थांब… मला माहितीये बाप्पाला काय आवडतं… मी आणणार….’ स्वयंपाकघरात जाणाऱ्या आईला थांबवत चिनू म्हणाला ‘…आणि आजीऽ संध्याकाळी ती खिरापत का काय आजोबा म्हणाले नाऽ ती कर हं सगळ्यांना द्यायला… आणि चॉकलेटचे मोदकपण पाहिजेत….’ स्वयंपाकघरातूनच ओरडत चिनू बाहेर आला.

‘गणेशाऽ हे घेऽ तुझ्या आवडीचे मोदक. आता पुढच्या वर्षी मीच डेकोरेशन… नाही… नाही… आरास करणार आणि हो आजोबाऽ तुम्ही मला मूर्ती करायला शिकवाल ना? आणि आजपासूनच आरती मी म्हणणार. ते यूट्यूब नको आपल्याला… पण… एऽ गणेशाऽ तू मात्र माय फ्रेंड बरं का…!’ चिनू उत्साहानं बोलत होता.

‘होऽ रे चिनूऽ तूऽऽ म्हणशील तसं… मला आवडली बरं का तुझी आयडिया…! मला उद्या जायला हवं पण मी पुढच्या वर्षी तुला पुन्हा भेटायची वाट बघेन बरं का चिनू…ऽ अरे होऽ पण जरी मी तुला दिसलो नाही नाऽ तरी मी तुझ्या शेजारीच आहे हां.’ सिंहासनावर बसताबसता बाप्पा म्हणाला.

बाप्पाशी गप्पा…! भाग एक

बाप्पाशी गप्पा…! भाग दोन

बाप्पाशी गप्पा…! भाग चार (अंतिम)

This entry was posted in My Musings and tagged , , . Bookmark the permalink.

3 Responses to बाप्पाशी गप्पा…! भाग तिसरा

  1. Pingback: बाप्पाशी गप्पा…! भाग दुसरा | My Experience

  2. Pingback: बाप्पाशी गप्पा… भाग चौथा | My Experience

  3. Pingback: बाप्पाशी गप्पा…! | My Experience

Leave a comment