‘शुक… शुक…
शुक… शुक…’
आवाज तर येत होता पण कुणी दिसत नव्हतं.
बहुतेक भास झाला.
‘अरेऽ परत कुठून हा आवाज आला?’
‘हां… हां… इकडेच…’
नीट निरखून बघितलं. तो एका कोपर्यात अवघडून बसलेला होता.
‘अरेऽ बाप्पाऽ तू इथे? असा…?’
‘होऽ होऽ धीर धर. सांगतो सगळं…’ खाली उतरत तो म्हणाला.
‘अरेऽ काय सांगू? महिनोन्महिने उलटसुलट प्रवास, मग असं एका जागी बसणं… नको होतं हल्ली हे.’
‘पण का? तू तर सर्वव्यापीयेस… मग असं अवघडून बसणं, प्रवास का?’
‘हं…’ निरिच्छेनं तो म्हणाला.
‘काहीतरी चुकतंय… तू काहीतरी सांगत नाहीयेस. अरेऽ मनातलं बोललास तर बरं वाटेल तुला…’
थोड्या निराशेनंच त्यानं सांगायला सुरुवात केली.
‘अरेऽ आधी कारखान्यातून व्यापार्यांकडे… मग तिथून देशविदेशांतल्या दुकानदारांकडे… काऽही विचारू नकोस. बरं दुकानात आलो की असं एका जागी बसावं लागतं मला कोण घरी घेऊन जाणार हे ठरेपर्यंत.’
‘बापरे! बाप्पाऽ मी तर ऐकूनच दमलो… बराच संयम आहे तुझ्याकडे.’
‘नसून सांगतो कुणाला?’ आवाजातली नाराजी त्यानी लपवली नाही.
‘हल्ली नाऽ कंटाळा येतो रे… सगळीकडे नुसती स्पर्धा नि चढाओढ… आणि चर्चा तर काय ‘हा नको तो घेऊ… हा लहान आहे… मागच्या वर्षीपेक्षा मोठा हवा… या वर्षी सिंहासनावर बसलेला नको… तो त्या सिनेनटाच्या स्टाईलचा घेऊ… एक ना अनेक….’
‘अरेऽ हौस असते रे… तू भेटणार वर्षातून एकदा… मग तुला आपल्या आवडत्या रूपात बघावंसं वाटणारच ना…?’ मी समजुतीच्या स्वरांत उद्गारलो.
‘हे सगळं मान्यये रे… पण त्यामागचा ते भाव, ती श्रद्धा, तो सात्त्विकपणा… कुठे गेलं रे? अरेऽ तुला सांगतो, माझे आजोबा, बाबा सांगायचे की, पूर्वी घरच्या चौरंगावर घरीच घडवलं जायचं मला… निसर्गातले रंग वापरून रंगवलं जायचं… इतकंच काय तर पानाफुलांची आरास असायची. कसलाही दिखावा नाही की बडेजाव नाही.
हळूहळू मला घडवणारे कारागीर आले. त्यांच्याकडे पाट देऊन आणि कशी मूर्ती हवी हे सांगून यायचं. मग ते तशी मूर्ती घडवायचे. कारागीर जेवढा चांगला तेवढा लवकर पाट द्यायला लागायचा… या सगळ्याचा व्यापार कधी झाला कळलचं नाही रे….’ त्याची नजर शून्यात हरवली होती.
‘…आणि आता तर काय रेऽ तो सात्त्विकपणा, शांतपणा, पूजा करतानाचे निर्मळ भाव, सगळंच हरवलंय. वाटतं ओरडून सांगावं… मला निर्गुण, निराकार म्हणता नाऽ मग एक वर्ष घडवा ना मला तुमच्या हातांनी… माती वापरा ना म्हणजे नंतर मातीत मिसळून जाईन मी आनंदानं. दाखवण्यासाठी नाही तर माझ्याशी जोडलं जाण्यासाठी, तुमच्या घरी येण्यामागचा माझा उद्देश समजून घेऊन करा रे माझी पूजा…’
‘बाप्पाऽ आज जरा जास्तच नाराज दिसतोयस तू…’ त्याचा हात हातात घेत मी म्हणालो.
‘तसं नाही रे… पण…’ बोलता-बोलता तो एकदम थांबला. त्याच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलले. कपाळावरच्या आठ्या विरून चेहऱ्यावर मंद हसू झळकलं…!
‘काय झालं बाप्पा? अचानक थांबलास?’
‘अरेऽ तो बघऽ तो छोटू शोधतोय मला. काल आला होता. माझ्याकडे बघून हसला आणि म्हणतो कसा? ‘माय फ्रेंड गणेशा… माझ्या घली येशील ना…? आपण गप्पा मालू आईडॅडा ऑफीशला गेले की…’ आता मी दिसलो नाही तर नाराज होईल. असे भाव आता दुर्मीळ झालेत रे. त्याच्यासाठी जायलाच हवं. चल.’ मी काय बोलतोय याकडे लक्ष न देता तो गेलासुद्धा.
‘बरं बाप्पाऽ काळजी घे… भेटूच परत…’ मी पुटपुटलो.



Pingback: बाप्पाशी गप्पा…! | My Experience
Pingback: बाप्पाशी गप्पा…! भाग तिसरा | My Experience
Pingback: बाप्पाशी गप्पा… भाग चौथा | My Experience