आज जरा अडनिड्या वेळेलाच त्याच्याकडे गेलो होतो.
नुकतंच दुपारचं जेवण झालं असावं. तांबूलपान चाललं होतं….
मी आत शिरताच माझ्याकडे बघून मंद स्मित करून मी आल्याची दखल घेतल्याचं सांगितलं.
जरा वेळ टेकून मी विचारलं ‘काय रे बाबाऽ पोटभर जेवलास ना?’
‘नाही रेऽ सध्या जरा कमीच जेवतोय. पुढचे काही दिवस धावपळ आहे ना…’
‘का बरं?’ खाण्यावर प्रेम करणारा तो असं काही म्हणतोय यावर विश्वास न बसल्यामुळे मी पटकन विचारलं.
‘माझ्या मित्रमैत्रिणींकडे जातोय रे…! सगळ्यांनाच माझं खाण्यावरचं प्रेम माहितीये ना त्यामुळं अगदी साग्रसंगीत जेवायला वाढतात…’
‘मग तर मजाय तुझी…’ थोडा हेवा वाटून मी म्हणालो.
‘अरेऽ तुला असंच वाटणार रे… माझं काय होतं ते मलाच माहीतये. त्यांच्या प्रेमापोटी अपचन झालं तरी नाही म्हणता येत नाही आणि जेवायला पदार्थसुद्धा इतके की काय विचारू नकोस…’ तो त्याची व्यथा सांगत होता.
‘मी इतकं खाऊ शकेन का… याचा विचारसुद्धा करत नाहीत रे. बरं आता… इतकं वाढतात तर निदान निवांत जेवू तरी द्यावं… तर तेही नाही… मी जेवलो समजून दोन मिनटांत लगेच ताट उचलून नेतात. तूच सांग आता… मी काय म्हणू यांना…?’
‘हं…ऽ बाप्पाऽ याचा तर विचार कधीच केला नाही.’
‘अरेऽ काय आणि किती सांगू तुला… मला घरी घेऊन जाण्यापासून ते मला परत पोहोचवेपर्यंत किती, कायकाय सुरू असतं… त्यांच्या प्रेमातिरेकावर हसावं की रडावं मला कळतच नाही.’
‘काय रे? कसला विचार करतोस? माझ्याशी गप्पा मारायला आलास नि विचार कसला करतोयस? काही हवंय का?’ विचारात हरवलेल्या मला हलवत तो म्हणाला.
कसनुसं हसत मी म्हणालो ‘अं…ऽ काही नाही… येतो मी…!’
‘मलाही निघायला हवं… पण येत जा रे अशाच गप्पा मारायला, माझी ख्यालीखुशाली विचारायला… बरं वाटतं…! आल्यावर सांगीन सगळे किस्से. चलाऽ उशीर होतोय… उंदीरमामा वाट बघत असतील.’ जागेवरून उठत तो म्हणाला.
परत कधीतरी त्याच्याशी बोलायला यायचं ठरवून गणपतीची मूर्ती आणायला मी बाजारात निघालो.


Pingback: बाप्पाशी गप्पा…! भाग दुसरा | My Experience
Pingback: बाप्पाशी गप्पा…! भाग तिसरा | My Experience
Pingback: बाप्पाशी गप्पा… भाग चौथा | My Experience