मराठी भाषेची कार्यशाळा घ्यायची या बोलण्यापासून सुरू झालेला प्रवास आज शाळेत पहिला वर्ग घेण्यापर्यंत आला.
सहयोगीच्या रिवाजाप्रमाणे योगेश सरांनी आणि उल्कानी तयारी करून घेतली असली तरीसुद्धा मी थोडी साशंक होते.
मुलांना जशी पहिल्यांदा शाळेत जाताना धाकधूक असते तशीच काहीशी माझी अवस्था होती… तशी तर मीही पहिल्यांदाच निघाले होते ना शाळेत…
काय घ्यायचं, कसं घ्यायचं याची उजळणी मनातल्या मनात चालू होती.
मुलांसोबत मी मूल होऊ शकेल का…
ती माझ्यासोबत मजा करत शिकू शकतील का… सहकाऱ्यांची माझ्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण करता येईल का…
असे एक ना अनेक प्रश्न…!
…मात्र दहा वाजता वर्ग सुरू झाला आणि सगळ्या कुशंका हवेत विरून गेल्या. दोन तास मजा करत, उड्या मारत कसे भुर्रकन उडून गेले…
दोन तासांनी लक्षात आलं की, मुलांनी आणि सहकाऱ्यांनी मला स्वीकारलंय… तो क्षण चिमटीत पकडण्याचा हा प्रयत्न…
पुढच्या वेळी काय सुधारणा केल्या पाहिजेत, मुलांना जे सांगायचंय ते अधिक रंजक, सहजसोप्या पद्धतीनं कसं सांगायचं याचा विचार करत शरीर घरी पोहोचलं तरी चुकार मन अजून वर्गातच रेंगाळतंय.
रश्मीमावशी, निकिता, विद्या, अरुंधती, मालती… या सगळ्यांच्या पाठिंब्यानं हे धाडस करण्याचं बळ मिळालं…!
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात संचितात अशा समृद्ध अनुभवाची पडलेली भर जबाबदारीची जाणीव ठळक करून गेली.


