२०२४: प्रवास अनुभवांचा

बघता-बघता एकविसाव्या शतकातली चोवीस वर्षं सरली…

नि

पंचविसावं लागलं….

अरे! असं सावरून बसायची गरज नाही.

मी काही उपदेशात्मक, प्रवचनात्मक बोलणार नाहीये.

फक्त सरत्या वर्षाकडे बघताना जे जाणवलं ते बोलले.

बघण्याचा दृष्टीकोन बदलला की एकच गोष्ट पण ऐकायला किती वेगळी वाटते ना…

बघा हं!

‘माझा जन्म एकोणीसशे काहीतरी साली झाला.’

असं लिहिलं तर फार काही वाटत नाही पण

‘माझा जन्म मागच्या शतकात झाला.’

असं लिहिलं तर…

आता काय विचार आले मनात?

लागलात ना तुम्हीसुद्धा विचार करायला?

अनेक बदल डोळ्यांसमोरून वार्‍याच्या वेगानी पळाले की नाही?

असो! माझा उद्देश काय आणि कसं बदललं हे सांगण्याचा नाहीये.

मी २०२४मध्ये मिळालेल्या सगळ्या चांगल्यावाईट गोष्टींबद्दल धन्यवाद देण्यासाठी लिहिणार आहे.

तसं हे वर्ष खूपच धावपळीचं गेलं… म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ नंतर ३१ मार्च २०२४ कधी आला समजलंच नाही. या तीन महिन्यांत एक लिटरेचर फेस्टिव्हल आणि एक बिझनेस नेटवर्किंग कॉन्फरन्स असे दोन मोठे कार्यक्रम झाले. दोन्ही कार्यक्रमांचं स्वरूप वेगळं… माझ्या जबाबदार्‍या वेगळ्या…!

लिटरेचर फेस्टिव्हल मी गेले बारा वर्षं करतेय तरीही या वर्षी काही अनपेक्षित गोष्टींनी माझ्या अनुभवाची परीक्षा बघितली तर दुसरीकडे बिझनेस नेटवर्किंग कॉन्फरन्स म्हणजे काय असतं; ती कशी आखली जाते; आणि नक्की मी काय करायला हवं… हे सगळंच नवीन होतं….

या कॉन्फरन्सनी मला अनेक गोष्टी शिकवल्या…

स्वतःच्या ताकदीवर शंका न घेता… ‘येस! आय कॅन डू ईट!’ हा विश्वास निर्माण केला.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी कायम पडद्यामागे राहायला आवडणारी मी पडद्यावरसुद्धा तितक्याच ताकदीनं वावरू शकते आणि ते मी केलं पाहिजे  ही जाणीव महाबिझनं करून दिली.

‘गोष्ट श्रमणार्‍या जिवांची’ या पुस्तकाचं काम पूर्ण झालं… आणि या कामानं व्यावसायिक पातळीवर एका नवनिर्मितीची अनुभूती दिली.

साहित्यक्षेत्रात केलेलं काम आणि अनुभव यांची दखल पुणे आकाशवाणी केंद्रानं घेतली आणि ‘साहित्य आणि भाषा क्षेत्रांतल्या व्यावसायिक संधी’ या विषयांवर विचार मांडण्याची संधी दिली.

या मुलाखतीनंतर आलेल्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक होत्या. इतकंच नाही तर काही जणांनी याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी सहयोगी घेत असलेल्या कार्यशाळासुद्धा केल्या. संधी सांगताना चालून आलेल्या संधी…!

२०२४मध्ये हाँगकाँग आणि व्हिएतनाम या देशांना भेट दिली. पंधरा दिवस गेलो होतो. अर्थात या प्रवासाचं कुठलंच श्रेय माझं नाही. याची तयारी, आखणी, बुकिंग सगळंसगळं संग्रामनी केलं. या ट्रीपमधली प्रत्येक गोष्ट ‘परफेक्ट टू द लास्ट डॉट.’ होती.

हाँगकाँग डिस्नेलँडमध्ये घालवलेला दिवस माझ्यासाठी स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा होता. त्या दिवसाबद्दल परत कधीतरी.

मकाऊमध्ये कॅसिनोमध्ये गेल्यावर समजलं की, शाळेत असताना अल्जेब्रामध्ये शिकलेला प्रोबॅबिलिटीचा धडा किती महत्त्वाचा असतो. याविषयी अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेटा.

व्हिएतनाममध्ये फिरताना अनेक प्रश्न पडले. त्या देशाचा इतिहास समजून घेताना व्हिएतनामीज् लोकांचा चिवटपणा प्रामुख्यानं जाणवला.

फिरून परत आलो आणि वेध लागले या वर्षातल्या आमच्यासाठी खास असलेल्या घटनेचे… आशा भोसले आणि सोनू निगम यांच्या कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम आमच्यासाठी अनेक कारणांनी खास होता कारण आम्ही दुबईत पहिल्यांदाच लाइव्ह कॉन्सर्ट बघितली. तीही आशा भोसले आणि सोनू निगम यांची. आशा भोसलेंना गाताना ऐकणं ही पर्वणी होती.

Overall, the year ending on a hight note… (Did you notice that pun?)

Read English here.

This entry was posted in My Musings and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

2 Responses to २०२४: प्रवास अनुभवांचा

  1. Pingback: 2024 Highlights: Literature, Travel, and Growth | My Experience

  2. Neelam's avatar Neelam says:

    Wishing 2025 also a memorable one for you.

    Like

Leave a comment