पिगी बँक

आज सकाळी काही नाणी मी माझ्या पिगी बँकेत टाकताना अचानक लक्षात आलं की बरेच दिवसांत मी यात भर नाही घातली. असं का झालं याचा विचार करताना लक्षात आलं की, आजकाल जीपे, फोनपे, सॅमसंग पे, कार्ड पेमेंट असे अनेक पर्याय असल्यामुळे आपण खिशात नाणीनोटा ठेवतच नाही तर सुट्टे पैसे कुठून येणार डब्यात टाकायला…?

हं… म्हणजे आता कळतनकळत पैसे बाजूला टाकायला शिकवणारी पिगी बँक नाही आणि त्या पैशांतून पूर्ण करायच्या स्वप्नांची यादी नाही….

आम्ही लहान असताना मातीची छोटीछोटी मडकी यायची… त्यांना नाणी किंवा घडी घातलेली नोट आत जाईल अशी छोटी फट असायची. एकदा पैसे आत टाकले की जोपर्यंत ते मडकं पूर्ण भरत नाही किंवा त्या पैशांची गरज निर्माण होत नाही तोपर्यंत पैसे बाहेर काढाता यायचे नाहीत कारण पैसे काढायच्या वेळेस ते मडकं जमिनीवर आपटून फोडायला लागायचं नि मगच खजिना हातात यायचा.

गुल्लक किंवा मातीची पिगी बँक

नंतर डालड्याचे किंवा रसाचे येतात तसे पत्र्याचे डबे यायचे… त्यांनासुद्धा अशीच फट असायची… या डब्यांमध्ये मात्र झाकण असलेले आणि नसलेले असे दोन प्रकार होते… त्यामुळे झाकण काढून रक्कम काढली की परत पैसे टाकायला जागा व्हायची. दुसरा प्रकार म्हणजे चौकोनी पेटी असायची आणि तिला कुलूप असायचं. पैसे आत टाकताना कुलूप उघडायला लागायचं नाही. झाकणाला एक फट असायची. त्यातून पैसे आत टाकायचे.

पत्र्याची / टीनची पिगी बँक

जसेजसे आम्ही मोठे होत गेलो तसंतसं पिगी बँकेचं स्वरूप बदलायला लागलं. मग बॅटरीवर चालणार्‍या बँक आल्या… बटण दाबलं की हात, ससा किंवा इतर कुठलातरी प्राणी बाहेर यायचा आणि समोर ठेवलेलं नाणं घेऊन आत जायचा. त्याच्यात नोटा टाकायला वेगळी फट असायची. त्यांना छोटं कुलूपसुद्धा यायचं.

काही वेळा तो प्राणी बाहेर येताना संगीतसुद्धा वाजायचं. लहान मुलांना ती गंमत वाटायची. मग त्यात पैसे टाकण्यासाठी हट्ट व्हायचा आणि आईबाबासुद्धा आनंदानं द्यायचे ते पैसे.

मजा तेव्हा यायची जेव्हा आईबाबांना सुट्टे पैसे लागले की ते मुलांकडे मागायचे. मग त्याचा अगदी हिशोब ठेवला जायचा.

लहान असताना माझ्याकडे ती मातीची मडकी होती, ते पत्र्याचे चौकोनी डबे होते. जेव्हा बाबा रोज एक रुपया द्यायचे तेव्हा ते त्याच्यात टाकायची मी. थोडं मोठं झाल्यावर जेव्हा नोटांमध्ये म्हणजे दोन रुपये, पाच रुपये असा मेहनताना मिळायचा तेव्हा ते ठेवायला एक पाकीट होतं. साधारण शंभर रुपये झाले की सुट्टे पैसे देऊन बाबांकडून बंदे घ्यायचे असा नियम होता. असे साठवलेले पैसे जेव्हा हॉस्टेलला राहायला गेले तेव्हा कधी, कसे खर्च झाले आता आठवत नाही.

जेव्हा बँकेत खातं उघडलं तेव्हा माझ्या आयुष्यातली पिगी बँक बंद झाली पण लग्न झालं आणि जेव्हा पहिल्यांदा दुबईत आले तेव्हा सुट्टे पैसे साठवायचं ठरवलं. दरवेळी बाहेर गेलं की आल्यावर सगळी नाणी एका डब्यात ठेवायची. एक वर्ष राहून जेव्हा मी पुढच्या शिक्षणासाठी परत भारतात जाणार होते तेव्हा मला आठवतंय की, माझ्याजवळ शंभर की एकशे पंधरा दिरहम साठले होते.

२०१०ला मी परत आले दुबईत आणि मग पुन्हा पैसे साठवायला सुरुवात केली. या वेळी ब्रेड ठेवायचा प्लास्टीकचा डबा म्हणजे माझी पिगी बँक होती. आता मात्र एक नियम केला होता की, पूर्ण डबा भरल्याशिवाय ती नाणी आणि नोटा मोजायच्या नाहीत. त्या वेळी आजच्या इतके सगळे व्यवहार कार्डवर व्हायचे नाहीत त्यामुळे कधी सुट्टे लागले तर त्यातून काढायचे आणि तेवढे बंदे त्या डब्यात टाकायचे की झालं.

माझी पिगी बँक

एकदा मोजलं होतं तेव्हा मला आठवतंय त्याप्रमाणे साधारण एक हजार दिरहम जमा झाले होते. त्या पैशांतून मी नंतर कधीतरी पुस्तकं घेतली होती.

आता लहान मुलांना वाटेल काय उगाच… ‘आमच्या काळी’चं तुणतुण लावलंय…. आईबाबा आम्हाला पॉकेटमनी देतात आणि त्यातून आम्हीपण पैसे साठवतोच की…’ पण पॉकेटमनी न मिळणार्‍या जमान्यात वाढलेल्यांना विचारा या पिगी बँकेचं महत्त्व… नोकरी न करणार्‍या गृहिणीला विचारा असे पैसे साठवून घरी गरजेची वस्तू घेतल्याचा आनंद किंवा अडीअडचणीच्या वेळेला घरच्यांच्यासाठी ते पैसे खर्च करतानाचं समाधान….

आज जेव्हा मी माझ्या डब्यात पैसे टाकले तेव्हा जाणवलं की, आता महिनोन्‌महिने त्यात पैसे टाकले जात नाहीत. डबा भरलाय पण त्यात किती जमा झालेत हे बघायचीसुद्धा भीती वाटते. न जाणो परत इतका भरताच आला नाही तर कारण कार्ड असलं तरी पिगी बँकेचं नसतं आणि तिथे ते चालतही नसतं.

Read in English

This entry was posted in My Musings and tagged , , , , , . Bookmark the permalink.

2 Responses to पिगी बँक

  1. Pingback: The Piggy Bank | My Experience

  2. Sangram's avatar Sangram says:

    खूपच छान

    Like

Leave a comment