अन् मन मांजर होतं…

मनात विचारांची पळापळ चालू आहे का लपाछपी

क्षणात जवळ येतात तर क्षणात लांब पळून जातात

बरं आले तर काय गप्पा मारतात समजतच नाही

मी काही विचारलं की लागलीच पुन्हा सुरू होतो लपाछपीचा खेळ

कुणी काळाच्या झोक्यावर बसवतं तर कुणी प्रश्नचिन्हांच्या भुलभुलैयात ढकलतं

कुणी हसवायचा प्रयत्न करतं तर कुणाच्या आठवणींनी डोळे डबडबतात

कधी मन पळ काढायला बघतं तर कधी स्वतःच्या कोषात जाऊन बसतं

आपल्याला कुणीही बघत नाहीये अशी स्वतःची समजूत घालतं

डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजरीसारखं

विचारांचा हा खेळ न्याहाळताना माझं भान हरपतं

अन् भानावर येता क्षणी

पळापळीचा खेळ पुन्हा सुरू होतो

मला बरं वाटावं म्हणून मनसुद्धा त्यात सामील होतं

जिंकण्याची आशा वाटून आभाळ दोन हात उरतं

अन् माझं लक्ष नाहीसं बघून मन नवीन खेळ मांडतं…

जोडसाखळीचा…!

This entry was posted in My Musings and tagged , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment