काही दिवसांपूर्वी इंदिरा भालचंद्र पुरस्कार प्राप्त, प्रशांत दळवी संपादित ‘दायाद ‘ हे एक सुंदर पुस्तक वाचनात आले. मराठीत एखाद्या नाटकाच्या पडद्यामागच्या घडामोडी लिहून लोकांसमोर मांडण्याचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. बरं! हे पुस्तक एका नाही तर तीन नाटकांचा पडद्यामागचा प्रवास वाचकांसमोर मांडते.
‘दायाद’ चा अर्थ आहे वारसा, जो आधीची पिढी पुढच्या पिढीला देते. या पुस्तकातून महेश एलकुंचवार लिखित नाट्यत्रयी चा वारसा प्रेक्षकांना दिला आहे. ती तीन नाटके म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’. या नाटकांचे स्वतंत्र प्रयोग तर झालेच पण सलग नऊ तास सुद्धा प्रयोग झाले आहेत. मराठी असे प्रयोग खूप कमी झाले असावेत.
ही तीन नाटके तीन वेगळे कालखंड दाखवतात. त्यासाठी सेट उभारणे हे एक मोठ्या जिगरीचे काम होते. प्रदीप मुळ्ये यांनी हे सेट उभारतानाचा पूर्ण प्रवास वाचकांच्या डोळ्यासमोर उभा केला आहे. अक्षरशः घर बांधताना जशी आधी ब्लू-प्रिंट, फ्लोअर – प्लान बनवला जातो तसच या नाटकाच्या सेट बाबत घडले आहे.
या नाट्यत्रयीचा भाग असलेल्या कलाकारांनी त्यांचे अनुभव या पुस्तकात कथन केले आहेत. ते वाचताना आपणही त्या नाटकाचा एक भाग होऊवून जातो. पुस्तकाच्या शेवटी काही मान्यवर लोकांच्या या प्रयोगाबद्दलचे अभिप्राय हे नक्कीच वाचनीय आहेत.
साधारणपणे सिनेमाच्या पडद्यामागच्या गोष्टी या रेकॉर्डकरून ठेवल्या जातात पण एखाद्या नाटकाच्या पडद्यामागच्या गोष्टी इतक्या सुंदरपणे लिहिल्या गेल्या आहेत कि हि नाटकं कधी बघायला मिळतील असं झाले. इंग्लिश भाषेत असे काही प्रयोग झाले किंवा असे काही लिहिले गेले कि त्याचा उदो-उदो होतो. पण मराठीतसुद्धा असे काही घडू शकते हे या पुस्तकाने दाखवून दिले आहे. ही नाट्यत्रयी जरी मराठीतून असली तरी हे पुस्तक मात्र इतर भाषांत यायला हवे असे मला वाटते तरच ही ‘दायाद’ खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढील पिढीकडे जाईल.