काही काळापूर्वी मी लॉक ग्रीफ्फिन वाचले आणि वसंत लिमये यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. त्यानंतर विश्वस्त वाचायचे असे ठरवले होते पण म्हणतात ना ‘हर एक चीज का वक़्त होता है|’
२ आठवड्यापूर्वी प्रत्यक्ष लेखकाच्या भेटीचा योग इथे दुबईमध्ये जुळून आला. विश्वस्तच्या मागची कहाणी जाणून घेता आली आणि त्यांची स्वाक्षरी पुस्तकावर घेता आली. पुस्तक हातात आल्यावर अधाश्यासारखे त्यावर तुटून पडले. पुस्तक वाचताना लक्षात येते कि लेखकाने किती अभ्यास केला आहे प्रत्येक गोष्टींचा.

Book Cover
इतक्या खोलात जावून लिहिलेली पुस्तके मराठीत कमी आहेत जवळ जवळ नाही म्हटले तरी चालेल. प्रत्येक घटना इतक्या सुंदरपणे वर्णन केली आहे कि डोळ्यसमोर एक चित्र उभे राहते. काही लोकांनी वसंत लिमयेंना भारताचा डॅन ब्राउन म्हटले आहे. जे वर्णन अत्यंत सार्थ आहे.
कोण कुठली ५ मुले एका इतिहास अभ्यास आणि गिर्यारोहणाच्या छंदामुळे एकत्र येतात. गड किल्ल्यांना भेटी देता देता त्यांच्या हातात काही असे पुरावे लागतात कि ज्यामुळे कदाचित इतिहासच बदलून जाईल. यासाठी संशोधन करताना त्यांना सरकारी लाल फितीचा सामना करावा लागतो त्याचसोबत काही वाईट प्रवृत्ती त्यांच्या मागावर असतात. हे संशोधन करताना त्यांचे काही साथी मारले जातात. अर्थात यापेक्षा जास्त सांगणे म्हणजे रहस्यभेद केल्यासारखे होईल. यातील काही पात्रं ही अस्तिवात आहेत पण त्यांची नावे बदलली आहेत. घडलेल्या घटना काही अंशी खऱ्या आहेत. ज्या घटनाबद्दल काही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत त्या घटनांमध्ये काहीच बदल केलेला नाही. थोडक्यात सांगायचे तर एक उत्तम सत्यावर आधारित एक काल्पनिक कथानक आहे.
पूर्ण कथानक खुर्चीला खिळवून ठेवते. लिखाणाची शैली उत्तम आहे यात वादच नाही. एक उत्तम कलाकृती! वाचलीच पाहिजे!