“आई आपली जात काय आहे ग? आम्हाला शाळेत विचारले आहे.”
“प्रचिती! पण पूर्ण नाव काय?” “तलाठी म्हणजे तु ……. का? “
लहान असताना या प्रश्नांचे कारण कळत नव्हते पण हे प्रश्न मला कधीच आवडले नाहीत. “कोणी एक अमुक जातीची आहे म्हणून मैत्री करू नको, तिच्याबरोबर खेळू नको.” असे आईबाबांनी पण नाही सांगितले, त्यामुळे जात म्हणजे काही महत्वाची गोष्ट असते असे कधी वाटलेच नाही. लहान असताना वाटायचे कि लोकांना मी कुणाची मुलगी हे माहित करून घ्यायचे आहे म्हणून ते आडनाव विचारात आहेत. आमचे गाव छोटे होते त्यामुळे सगळे एकमेकांना ओळखायचे त्यामुळे आडनाव विचारले असेल कदाचित असे हि वाटायचे. शिक्षणासाठी जेव्हा मोठ्या शहरात गेले त्यावेळी पण नुसते नाव सांगितले तरी आडनाव विचारले जायचेच. स्वतःला आडनावावरून जात जाणून घ्यायची आणि त्यानुरूप समोरच्याशी वागायची सवय नसल्याने, मला कळायचे नाही कि लोक माझे आडनाव का विचारातात. हळू हळू हा प्रश्न अंगवळणी पडला आणि त्यानुसार लोकांचे वागणे हि! आणि हा जातीवाचक प्रश्न काही काळापुरता सुटला.
लग्न झाले आणि मी दुबईत आले. इथे अजून नवीन प्रश्न निर्माण झाले. भारतीय लोकांना मी भारतीय आहे हे पुरेसे नव्हते तर माझा धर्म, माझे शहर, माझी मातृभाषा हे बारकावे जास्त महत्वाचे वाटत. सुरवातीला कोणी हे प्रश्न विचारले कि मला राग यायचा पण मी मुग गिळून गप्प बसायचे. हे असंच असत असे म्हणून स्वतःची समजूत काढायचे. मात्र पहिल्या भेटीत हे प्रश्न मी विचारणार नाही असे माझे तत्व बनले. खूप चांगली मैत्री झाल्यानंतरसुद्धा तशी चर्चा झाल्यास किंवा काही गरज पडल्यासच मी या विषयासंदर्भात अधिक जाणून घ्यायचे असे ठरवून टाकले. नोकरी करताना अनेक देशातील लोकांशी संबंध आला पण त्यावेळी सुद्धा त्यांना मी त्यांचा देश विचारला बाकी काही नाही. दुर्दैवाने भारतीय सोडून इतर कोणीही जात किंवा धर्म नाही विचारला. अर्थात असा माझा अनुभव आहे तुम्ही त्याच्याशी सहमत असालच असे नाही. हां! खूप चांगली ओळख झाल्यावर मग कोणी हा प्रश्न विचारला तर मला त्याचे वाईट नाही वाटत कारण त्यांचे माझ्यशी असलेल संबंध हे ‘प्रचिती’ म्हणून असतात त्याला इतर कसलीही झालर नसते.
मी सर्व धर्मांचे ग्रंथ वाचले नाहीत पण माझ्या विविध धर्माच्या मित्र मैत्रिणींसोबत ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी कळले कि सगळे धर्म आपल्याला प्रथम एक चांगला माणूस बनायला सांगतात. दुसऱ्याचा आदर करायला शिकवतात, प्रामाणिकपणे केलेले कुठलेही काम लहान मोठे नसते हे सांगतात. मग आपण का या धर्माच्या आणि जातीच्या चौकटीत माणसाला बसवतो? का सरसकट सगळ्यांना एकाच तागडीत तोलतो?
आज या विषयावर लिहायला कारणसुद्धा तसे खासच घडले. मी माझ्या ऑफिसबाहेर एका सिक्युरिटीवाल्या माणसाजवळ गप्पा मारत होते. तो झिम्ब्बवेचा आहे. त्याने मला विचारले कि, तुम्ही भारतीय आहात का? मी हो म्हणाले. मग तो म्हणाला तुम्हाला चालणार असेल तर एक खासगी प्रश्न विचारू का? आता मला प्रश्न पडला कि हो म्हणावे कि नाही. इतक्यात तो म्हणाला कि प्रश्न ऎकून तुम्हाला वाटले तर तुम्ही उत्तर नका देवू. मी त्याला म्हणाले, “विचार तुझा प्रश्न.” तो म्हणाला, “तुम्ही हिंदू आहात का?” मी त्यावर उत्तर दिले कि, माणुसकी हा माझा पहिला धर्म आहे आणि मग मी हिंदू धर्मात जन्मले म्हणून हिंदू झाले. मला हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे, पण माझीच संस्कृती सर्वश्रेष्ठ हा अट्टाहास नाही. त्यावर त्याने जे सांगितले ते ऎकून वाटले कि माझा धर्म कोणता या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आहे. तो म्हणाला, ” सगळे जग जर असा विचार करायला लागले तर गोष्टी किती सोप्या होतील. लोक देवाची प्रार्थना करतात आणि प्रार्थना झाली कि बाहेर येवून चोरी मारी करतात, बायका मुलांना मारहाण करतात, इत्यादी… मग त्या धर्माने दिलेल्या शिकवणीचा फायदा काय?”
त्याचे हे विचार ऎकून मी दोन मिनटे विचारात पडले, तर तो पुढे म्हणाला, ” तुम्ही दुसरी व्यक्ती आहात जी म्हणाली माणुसकी हा माझा धर्म आहे आणि मी आधी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करत आहे.” इतके बोलून तो निघून गेला आणि माझ्या मनात विचार आला कि खरच किती गोष्टी सोप्या होतील ना जर प्रत्येकांनी असा विचार केला तर! त्यामुळे आजपासून कोणी भोचकपणा करायला माझी जात / धर्म विचारला तर मी सांगेन, “माणुसकी” ! आधी माणूस म्हणून एकमेकांना समजून घेवू मग खोलात शिरू.
टीप: या लेखाने मला कुठल्याही जाती धर्माच्या, आप-पर प्रांतीयांच्या भावना दुखवायच्या नाहीत. हे सर्वस्वी माझे विचार आहेत. आपणास नाही पटले तर सोडून द्या.