दुबईमध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ मध्ये माझा समावेश झाला आणि माझे मराठी वाचन परत सुरु झाले. सध्या माझ्याकडे असलेल्या पेटी मध्ये नीला सत्यनारायण यांचे ‘एक पूर्ण – अपूर्ण ‘ हे पुस्तक आहे. नीला सत्यनारायण यांचे ‘जाळ रेषा’ हे पुस्तक मी या आधी वाचले आहे. त्यांची लेखन शैली मला आवडली. त्यांनी फार स्पष्टपणे त्यांचे विचार मांडले आहेत.
‘एक पूर्ण – अपूर्ण’ हे पुस्तक ‘One Full One Half’ याचा अनुवाद आहे. हे पुस्तक डाऊन सिंड्रोम असलेल्या त्यांच्या मुलाला – चैतन्याला वाढवताना आलेले अनुभव सांगते. या सारख्या विषयावर लिहिलेली काही इंग्लिश पुस्तके मी वाचली आहेत पण मराठीत मी वाचलेले हे पहिलेच आहे.
या मुलांना वाढवणे सोपे नसते. नीला सत्यनारायण यांनी त्यांची नोकरी सांभाळून या मुलाला वाढवताना आलेले अनुभव इथे मांडले आहेत. पहिली मुलगी आहे. त्यानंतर चैतन्य जन्माला. मुलगी लहान असल्याने तिला या सगळ्या गोष्टी समजावणे म्हणजे एक दिव्य होते. ती नकळत आई बाबा पासून दुरावत गेली. एका आईची होणारी फरफट इथे खूप चांगल्या प्रकारे व्यक्त झाली आहे. त्याच सोबत घरचे, शेजारी, मित्र परिवार यांच्याकडून आलेले अनुभव त्यांनी इथे मांडले आहेत. लोकांकडून आधारापेक्षा किंवा सकारात्मक गोष्टींपेक्षा उपेक्षा आणि मनोबल खच्ची करणाऱ्या गोष्टी जास्त वाट्याला आल्या. मुलाला शाळेत पाठवताना ‘असा ‘ मुलगा आमच्या शाळेत नको हेच ऐकायला मिळाले. या मुलांसाठी वेगळ्या शाळा नव्हत्या.
या सगळ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला तो त्यांचा नवरा. हे पुस्तक वाचताना जाणवते कि एका कुटुंबाची धडपड, मानसिक ओढाताण आणि येईल त्या परिस्थितीला सामोरी जाण्याची वृत्ती!
नीला सत्यनारायण स्वतः सरकारी उच्चपदस्थ अधिकारी असूनसुद्धा त्यांना शाळा शोधणे, उपेक्षा या सगळ्याला सामोरे जावे लागले तिथे आजहि सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील हे आपण समजू शकतो. आजही या ‘खास’ मुलांसाठी म्हणावी तितकी जागृती समाजात नाही. या मुलांच्या आई वडिलांनासुद्धा असे मुल स्वीकारणे कठीण जाते.
नीला सत्यनारायण सारख्या अजून काही पालकांनी एकत्र येवून त्यांचे अनुभव समाजासमोर मांडले तर समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल. सदर पुस्तक http://granthali.com/ येथे उपलब्ध आहे.
मी पण हे पुस्तक वाचले आहे. नीला सत्यनारायण यांची लेखनशैली खरच खूप छान आहे.
त्यांच्या संघर्षातून खरंच खूप प्रेरणा मिळते.