नमस्कार!
माझा नाव प्रचिती. घरचे किंवा मैत्रिणी प्राची, प्रची अशी हाक मारतात. आता तुम्ही विचार करत असाल कि मी तुम्हाला माझ्या नाव बद्दल इतके का सांगत आहे. त्याचे काय झाले, काही काळापूर्वी कुणीतरी स्व:ताच्या नावाबद्दल लिहिलेला एक ब्लॉग वाचला आणि जाणवले कि मलापण माझ्या नावाबद्दल भारताबाहेर खूप वेगळे अनुभव आले ते तुम्हाला सांगावे म्हणून हा ब्लॉगप्रपंच!
सुरु पासून सुरु आपण .. लहानपण सगळं चिपळूणमध्ये गेले. तिथे स्वतःच्या नावापेक्षा बर्फवाल्यांची /सुधीरची / तलाठ्यांची (फक्त आडनावाने बरं का! उगाच गैरसमज नकोत 🙂 ) मुलगी, अभिची / मीराची बहिण इतकीच ओळख होती. शाळेतच काय ते नावाने हाक मारली जायची! तशी इतर वर्ग मैत्रीणीना टोपण नावे होती, पण माझ्या नावाची नशिबानी कोणी वाट नाही लावली (अर्थात माझ्या अपरोक्ष काही नावं ठेवली असतील तर मला माहित नाही) प्रचितीचे फार फार तर प्रची किंवा प्राची झाले.
बारावीनंतर शिकायला पुण्यात गेले तिथे माझ्या नावाचा एक नवीन अपभ्रंश झाला Pracs. काही लोकांनी माझे नाव वेगळे आहे असे सांगितले तर काहींनी माझ्या नावाचा अर्थ विचारला. ज्यांनी अर्थ विचारला त्यांना मी सांगितले कि सोप्या भाषेत सांगू तर, ‘अनुभव’ आणि जरा खोलात जावून सांगू तर जे दिसत नाही किंवा सांगता येत नाही.. ती अनुभूती. मग तर लोकांना माझे नाव अजूनच वेगळे वाटले.
तर मी साधारण ७ वर्षापूर्वी दुबईमध्ये आले. इथे आल्यावर अनेक देशातील लोकांना भेटले आणि मग सुरु झाला मला नावं ठेवायचा कार्यक्रम. म्हणजे चांगल्या अर्थाने कारण अनेक भाषा त्यात अनेक उच्चार त्यामुळे लोकांना प्रचिती हे नाव उच्चारायला महा कठीण. त्यामुळे माझ्या नावाचे उच्चार बघा कसे झाले — प्रीती, प्रतीती, प्रतीची, ई. सुरुवातीला कळायचे नाही इथे अरबी भाषा बोलणारे लोक मला ब्रशिती का म्हणतात? मी खूप प्रयत्न केले त्यांना माझे नाव प्रचिती आहे म्हणून सांगायचा आणि त्यांच्याकडून योग्य उच्चार वदवून घ्यायचा पण परिणाम शून्य. नंतर जेव्हा मी अरबी भाषा शिकले तेव्हा कळले कि या भाषेत ‘प’ आणि ‘च’ हि अक्षरचं नाहीत आणि म्हणून ‘पेप्सी’ चे ‘ब्यब्सी’ होत. काही लोकांनी Pracs म्हणून हाक मारणे पसंत केले तर काहींनी नुसतेच ‘P’. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचे लोकांना माझे नाव नीट उच्चारता नाही आले कि. मी ते उच्चार सुधारायचा प्रयत्न करायचे पण नंतर माझ्या लक्षात आले कि त्या लोकांच्या भाषेत जर हि अक्षरं नसतील तर त्यांना त्यांचा उच्चार कसा करायचा हे कसे माहित असेल? जसं मला माहित नाही फ्रेंच किंवा जर्मन उच्चार कसे करतात किंवा काही अरेबिक शब्द कसे उच्चारतात. बरं मग आता राहता राहिला प्रश्न मी माझ्या नावाचं स्पेलिंग न चुकता कसं सांगायचं? तर लवकरच मला उपाय मिळाला – A-अल्फा , B-ब्रावो… त्यामुळे आता माझे नाव P- (पॅरिस) R- (रोमिओ) A- (अल्फा) C – (चार्ली )H – (हॉटेल) I- (इंडिया) T – (टँगो) I – (इंडिया)