आजुबाजूला कसलाही आवाज नसतानासुद्धा बोलते ही शांतता.
ऋतुनुसार भाषा बदलते ही शांतता.
हो! शांतता बोलते ! कधी तुम्ही ऐकले आहे का हे शांततेचे बोलणे?
मी ऐकले आहे. निदान पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुमध्ये तरी.
काही दिवसांपूर्वी मी ऑफिस मध्ये बसले होते. बाहेर किमान ४४ ते ४५ डिग्री तापमान असावे. रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती. अधूनमधून काही गाड्यांची ये जा चालू होती पण ती ही गाडीतील एअर कंडिशनर चालू ठेवूनच. मी काही कामासाठी ऑफिसच्या बाहेर पडले आणि माझ्या गाडीकडे चालत निघाले होते. त्यावेळी मला जाणवले की उन्हाळ्यातील शांतता ही पावसाळ्यातील शांततेपेक्षा खूप वेगळी असते.
उन्हाळ्यातील शांतता ही भकास, निष्पर्णं, अंगाची काहिली करणारी असते. पक्षी ही झाडाच्या सावलीला किवा घरांच्या आडोश्याला बसलेले असतात. सूर्य जणू जमिनीला भेटायला आल्याप्रमाणे जमीन गरम असते, वारा ही आग ओकत असतो. झाडं सुद्धा उन्हाच्या काहिलीने हैराण झालेली असतात. उन्हाळ्याच्या शांततेमध्ये मनाला शांतता लाभत नाही, मन अस्वस्थच राहते.
परंतु पावसाळ्यातील शांतता म्हणजे एक थंड हवेची झुळूक. धरणी मातेच्या अंगाची काहिली थोडी कमी झालेली असते. झाडांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झालेले असते. पशु पक्षी निसर्गाचा आस्वाद घेत असतात. आणि मनाला लाभते ती एक प्रसन्न करणारी शांतता.
तुम्ही म्हणालं, शांतता हि शांतता असते. कधी तरी मनाच्या कोपऱ्यात डोकावून बघा, ऋतु बदलल्याचा परिणाम तुमच्या मनस्थिती वर पण जाणवेल. उन्हाळ्यात मन कसे अस्वस्थ असते. जरा पाऊस पडला आणि गार वाऱ्याची झुळूक अंगावर आली कि dil garden garden’ होते ना!
हो! शांतता बोलते ! …… nice
Cant agree more ! Well written but why so brief 🙂