बरेच दिवसांपासून Emirates Airline Festival of Literature (LitFest) बद्दल लिहायचा विचार चालू होता, पण काही ना काही कारणांनी राहून जात होते. शेवटी आज ठरवले कि काही झाले तरी आज लिहायचेच. दुबई मध्ये मी LitFest मध्ये गेली २ वर्षे काम करते. LitFest म्हणजे मराठी भाषेत सांगायचे तर साहित्य संमेलन. पण त्याच्या स्वरूपामुळे त्याला ‘महोत्सव’ म्हणणे जास्त योग्य वाटते.

इम्तियाज धारकर
हा महोत्सव दरवर्षी मार्च महिन्यात होतो आणि ५ दिवस चालतो. इथे स्थानिक तसेच परदेशी लेखक येतात, त्यांचे एकट्याचे किंवा इतर लेखकांबरोबर सत्र होतात. ते एक वेगळेच विश्व असते, अगदि अनोखी दुनिया. ह्या ५ दिवसात काही खास कार्यक्रम सुद्धा असतात. आपण आधी या खास कार्यक्रमांबद्दल थोडे जाणून घेवू. एक कार्यक्रम असतो Desert Stanza – वाळवंटात मोकळ्या आकाशाखाली, चांदण्यांच्या प्रकाशात नावाजलेले कवी त्यांच्या कविता विविध भाषेत सादर करतात. हा कार्यक्रम गेली ३ वर्षे चालू आहे. मी यावर्षी प्रथमच गेले होते. माझ्या ऑफिसमधील एकीने सांगितले कि तुला जरी भाषा नाही कळली तरी त्या जादुई वातावरणात त्या कवितेतील भाव नक्कीच कळतील. आणि खरच काय जादुई वातावरण होते ते!! योगायोग म्हणजे यावर्षी तो दिवस पूर्णिमेचा होता, म्हणजे दुग्धशर्करा योगच!
दुसरा विशेष कार्यक्रम म्हणजे Murder Mystery Dinner – तिकीट विक्री सुरु झाल्यापासून सर्वप्रथम या कार्यक्रमाची तिकिटे विकली जातात आणि अल्पावधीत सर्व तिकिटे संपल्याने दरवर्षी काही लोकांना निराश व्हावे लागते. या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात जाणून घेवू. या कार्क्रमात नामवंत लेखक सहभागी होतात. सहभागी झालेल्या सर्वाना एका खुनाचे रहस्य शोधायचे असते. जिंकणाऱ्या टीमला पुस्तके मिळतात बक्षिस. इतर कार्यक्रम हि तितकेच विशेष असतात. येथे येणाऱ्या सर्वाना प्रत्येक लेखकाची पुस्तके विकत घेता येतात, तसेच त्यांना त्या लेखकाची सही सुद्धा घेता येते त्या पुस्तकावर. माझ्यासाठी तर हि सुवर्णसंधी होती जगभरातील लेखकांना एका छताखाली भेटायची, त्यांचे विचार ऐकायची. हा महोत्सव गेली ७ वर्षे अव्याहत चालू आहे. या वर्षी या महोत्सवाला ३० देशातील १३० लेखकांनी भेट दिली. त्या लेखकांचे २०० सत्र झाले. या महोत्सवाला यावर्षी ३७००० लोकांनी भेट दिली.
अद्याप पर्यंत आपण फक्त महोत्सवाच्या ५ दिवसांबद्दल जाणून घेतले, पण या महोत्सवाच्या आयोजाकांबद्दल जाणून घेणे हि तितकेच महत्वाचे आहे. Isobel Abulhoul, OBE या ह्या महोत्सवाच्या संचालिका आहेत. ह्या महोत्सवासाठी साधारण १० ते १५ लोक वर्षभर काम करतात. जसजसा महोत्सव जवळ येईल त्याप्रमाणे या टीम मध्ये काही अजून लोक तात्पुरत्या स्वरुपात घेतले जातात. या टीमचा सर्वात महत्वाचा भाग आहेत “स्वयंसेवक”. या महोत्सवात साधारण २०० ते ३०० स्वयंसेवक सामील होतात. या सर्व स्वयंसेवकांना महोत्सवाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. हा महोत्सव म्हणजे संघ भावनेचे उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणूनच या महोत्सवाला गेली २ वर्षे Middle East Best Festival Award मिळाले आहे.
तुम्हा सगळ्यांना या महोत्सवाचे स्वरूप थोडक्यात कळण्यासाठी हा video पहा.
तसेच http://www.emirateslitfest.com या website वर तुम्हाला अधिक माहितीत मिळू शकेल. माझ्यासाठी तर हि नोकरी म्हणजे, ‘ दुग्धशर्करा ‘ योग आहे. नोकरी तर आहेच पण त्या पेक्षा महत्वाचे म्हणजे माझा वाचनाचा छंद हि जोपासला जातो.