रात्रभर मस्त पाऊस पडून गेला होता आणि अजून हि थोडी रिमझिम चालूच होती. हवेत मस्त गारवा आला होता. विचार केला आज थोडा निवांत चहाचा आस्वाद घ्यावा, थोडा पेपर वाचवा आणि मग ऑफिसला जायला निघावे, तसेही काही अतिमहत्वाचे काम वाट बघत नव्ह्ते. थोड्या वेळात ऑफिसला जायला बाहेर पडले, आणि लक्षात आले की आज पाऊस जरा जास्तच आहे. रस्त्यावर जागो जागी पाणी साचले होते. काही गाडीवाले जोरात गेल्याने अंगावर उडणाऱ्या पाण्यापासून पादचारी आपला बचाव करत होते. शाळेत जाणारी काही मुले बसची वाट बघताना पावसात भिजत होती आणि त्यांच्या आया (आई या शब्दाचे अनेक वाचन) त्यांना ओरडत होत्या.
ऑफिसला पोहचले तर सगळे पाउस या विषयावरच चर्चा करत होते. तसा कुणाचाच काम करायचा मूड नव्हता. बाहेर पडणारा पाउस बघुन भिजायची खूप इच्छा होती पण म्हणतात ना वयाने मोठे झाले की लोकं काय म्हणतील याचा विचार जास्त केला जातो.मी हि याला अपवाद नव्ह्ते; पण मनातल्या मनात विचार करत होते कि मला भिजायचे कारण कसे मिळेल? तशी संधी होती पण तोपर्यंत पाऊस असेल कि नाही माहित नाही. मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचे होतेच, गाडी थोडी लांब उभी करावी म्हणजे थोडे तरी भिजता येईल असा विचार करून बाहेर पडले. नशिबाने साथ दिली आणि नेमकी परत येताना पावसाची सर आली, चला भिजायची इच्छा तर पूर्ण झाली.
आता पाऊस म्हटले कि भजी, वडा, वाफाळता चहा असे सगळे ओघाने आलेच. मग काय ऑफिसला परत जाताना मस्त भजी आणि वडा पार्सल करून घेतले. ऑफिसला पोचताच सगळे नुसते तुटून पडले. थोडा पोटाचा तळीराम शांत झाल्यावर मी परत माझ्या जागेवरून बाहेरच्या पावसाचा आस्वाद घेऊ लागले. बाहेर पावसामुळे एक प्रकारची शांतता होती, आजूबाजूला थोडी झाडे असल्याने पक्षांचा किलबिलाट स्पष्ट ऐकू येत होता. रोजच्या कोलाहालापेक्षा हि शांतता मनाला मोहवून टाकत होती. मला हि पावसानंतरची शांतता खूप आवडते. पक्षांचा आवाज, शेत किड्यांची कीर कीर आणि जोडीला दूरवरून येणारा बेडकांचा आवाज असे सगळे असले तरी एक निरव शांतता असते.
एकंदरीतच सगळे वातावरण मन मोहून टाकत होते. इतक्यात कुणीतरी म्हणाले. ” अस्सलाम वालेकुम” आणि मी एकदम भानावर आले. मग जाणीव झाली कि मी दुबईमध्ये आहे, हा पाऊस इथे पडत होता आणि मन मात्र उगाचच तिकडे कोकणात रेंगाळत होते.
prachiti…..lekh khup chan…..dolyasamor kharech pavsache chitra ubhe rahile
thanks for following my blog